मुलांचा अभ्यास कसा घ्याल ?
मुलांचा सर्वांगीण विकास हा राष्ट्रीय दृष्टीनं साधयला हवा; यातूनच स्वावलंबनम सहकार्य, श्रम, सेवा आणि त्याग ही महान जीवनमूल्ये मुलांच्या अंगी बाणतील. मूल हे शिक्षणचे केन्द्र आहे, व अभ्यासक्रम हे संस्कृती संवर्धनाचे साधन आहे, ही गोष्ट लक्षात घेऊन बालविकास साधण्यासाठी शिक्षण संस्था आहेत. पालक प्रयत्नशील आहेत. समाजयंत्रणा योजना आखीत आहेत. पण या सर्व गोष्टी मुलाभोवती त्याच्या भावी जीवनाची पूर्वतयारी करण्यासाठी योग्य ते वातावरण निर्माण करण्यासाठी आहेत. याची जाणीव शिक्षकांना, पालकांना असेल तरच बाळांची उत्तम जडणघडण होऊ शकेल.
शाळेत येण्यापूर्वी मूल कोऱ्या पाटीप्रमाणे येत नाही. बऱ्याचशा गोष्टी त्याने मिळवलेल्या सतात. जन्मल्यापासून मूल शिकतच असते. त्याला मदत करणे एवढेच पालकांचे, शिक्षकांचे काम आहे. पालकाला मोकळेपणी शिकू देणे, त्याच्या शैक्षणिक जीवनातील अडचण दूर करणे एवढेच काम आपले. मूल हे घरात राजा असते; त्याला सत्ता साऱ्या घरात चालते. त्याचे सिंहासन म्हणजे आईची कटी असते. राजा घरात हुकूम सोडतो. सर्वांना ते पाळावे लागतात. पण एकदा का मूल शाळेत गेले म्हणजे शाळेत त्याला शिक्षकाचे ऐकावे लागते. दुसऱ्याचे हुकूम पाळणे मुलाला भाग पडते, मूल गांगरून जाते. म्हणून आरंभी घर व शाळा हा दुवा जितक्या उत्कृष्ट तऱ्हेने सांधला जाईल तितका शिक्षणाचा पाया नकळत दृढ होत जाईल. म्हणूनच ही खबरदारी घेणारा शिक्षक मुलाचा खरा विकास साधू शकेल.