● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमा व गुरु-शिष्य परंपरा


ह्या दिवशी महर्षी व्यासांनी पृथ्वीवर जन्म घेतला अशी आपल्या धुरिणांची श्रद्धा आहे. त्यामुळे संन्याशी मंडळी ह्या दिवशी व्यासांची पूजा करतात. त्यासाठी स्नानादी नित्यकर्मानंतर संकल्पपूर्वक एक सुती धूतवस्त्र अंथरतात. त्याच्यावर गंधाने पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा बारा रेषा काढतात. हेच व्यासपीठ! मग त्यावर ब्रह्मा, विष्णू, वसिष्ठ, पराशर, शक्ती, व्यास, शुकदेव, गौडपाद, गोविंदस्वामी आणि शंकाराचार्य यांना आवाहन केले जाते. त्यानंतर त्यांची विधिवत कृतज्ञतापूर्वक पूजा करतात. दक्षिणेकडील शंकरपीठांमध्ये ह्या दिवशी महोत्सवच असतो. व्यास हे अखिल जगाचे गुरु आहेत. आपल्या संस्कृतीची मूळ संकल्पना ही व्यासांचीच आहे. त्यांनीच तिची जोपासना केली. व्यास आपले धर्म-अध्यात्म-वाङ्मय अशा सर्वच विषयांतील गुरु आहेत. त्यामुळे आपली संस्कृती व्यासांचे असे कृतज्ञतापूर्वक स्मरण करते. ह्याच दिवशी आपल्या मातापित्यांची आणि गुरूंची पूजा करण्याची प्रथा आहे. गुरु-शिष्याचे नाते म्हणजे दोन आत्म्यांचे परस्परांशी असलेले अनोखे, अतूट नाते आहे. निष्ठावान शिष्य आणि आदर्श गुरु ह्यांचे परस्परांशी असलेले नाते अन्य मंडळींना कळणारे नसते. शिष्याला आपला गुरु हा देवाहूनही श्रेष्ठ असतो. तर शिष्याला भवसागरातून पैलपार नेण्याची शक्ती केवळ गुरुपाशीच असते.

गुरुपौर्णिमा ( आषाढ शुद्ध पौर्णिमा ) व सद्य:स्थिती
आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे आजच्या तिथीला आपण गुरूपौर्णिमा म्हणून गौरवितो. अनेक विद्यालयांतून, महाविद्यालयांतून श्रद्धाशील विद्यार्थी आपापल्या गुरूजनांसमोर आज विनम्र भावनेने नतमस्तक होतात. वेगवेगळया पंथोपपंथांतून ईश्र्वरभक्तीकडे जाण्याचे मार्ग शोधणारे मुमुक्षू-पारमार्थिक आजच्या दिवशी आपल्या गुरूंचे भक्तिभावाने पूजन करतात. ज्यांना या ना त्या कारणांमुळे, गुरूंचे समक्ष दर्शन वा सहवास घडू शकत नाही ते त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात. कलाक्षेत्रातसुद्धा आजच्या दिवसाला तसेच वेगळेआगळे महत्त्व आहे. संगीत क्षेत्रामध्ये ज्या गुरूकडून विद्या घेतली त्यांची काही सेवा किंवा घेतलेल्या विद्येबद्दलची कृतज्ञता श्रद्धापूर्वक आजच्या दिवशी व्यक्त केली जाते. ज्यांना आजच्या दिवशी अशा प्रकारे भक्तिभाव व्यक्त करणे शक्य होत नाही ते यानंतरच्या सोयीच्या दिवशी गुरूवंदनाचा कार्यक्रम करतात. गुरू आणि शिष्य हे एक अदभुत नाते आहे. गुरू म्हणजे केवळ मास्तर नव्हे, गुरू म्हणजे केवळ शिकविणारा नव्हे. ज्याला आपल्या शिष्याबद्दल ममत्व वाटते, आपल्यापाशी असलेली ज्ञानसमृद्धी शिष्यापर्यंत पोहोचवावी अशी ज्याला तळमळ असते. शिष्याद् इच्छेत् पराजयम् । या वचनाप्रमाणे शिष्याने आपल्याही पुढे जावे अशी इच्छा जो मनोमन बाळगतो तो खरा गुरू. आजकाल गुरूपूजनाचे कार्यक्रम खूप होत असले तरी सगळेच गुरु इतपत श्रेष्ठ दर्जाचे असतीलच असे म्हणता येत नाही, पण गुरूपौर्णिमेच्या दिवशी आपापल्या गुरूला त्या उच्चतम गुरूशिष्य परंपरेतील एक दुवा मानून त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेणे हा आपल्या संपन्न सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा तसेच अभिमानाचा भाग आहे.

व्यासपौर्णिमेलाच हे गुरूपूजन व्हावे ह्यात कोणता हेतू आहे ? कोणती योजना आहे ? व्यास हे सर्व गुरुंचे गुरु. परमगुरुंचे परमगुरु. व्यासांनी आपल्याला म्हणजे आपल्या भारतवर्षाला, आपल्या भारतीय संस्कृतीला खूप काही दिले आहे. त्यांनी वेदांचे विभाजन करून त्यांची नीट मांडणी केली हे तर खरेच. ब्रह्मसूत्रांच्या रूपाने त्यांनी अध्यात्मविचारांचा एक उत्तुंग हिमालय आपल्यासमोर उभा केला. महाभारतासारखा प्रचंड ग्रंथ त्यांनी लिहिला महाभारतातील व्यक्तिरेखा आपण आपल्या नेहमीच्या जीवनातही इतक्या सहजपणे शोधू पाहतो की, कर्णासारखा उदार, कृष्णासारखा कौतुकास्पद कारस्थानी, शकुनीमामासारखा कपटी, धर्मासारखा सच्छिल, भीमासारखा बलदंड, भीष्मासारखा प्रतिज्ञाबद्ध असे कितीतरी मानवी मनाचे आणि वर्तणुकीचे नमुने आपण महाभारतावरून नेहमीच्या बोलण्याचालण्यातही उचलीत असतो. कौरव-पांडवांच्या युद्धाचा संदर्भ वारंवार दिला जातो. बळाने वा संख्येने कमी असूनही जर सत्य आणि न्याय आपल्या बाजूला असेल तर शेवटी आपलीच सरशी होणार, हा विश्र्वास महाभारताच्या आधाराने बळकट होऊ शकतो. बऱ्यावाईट वागण्याचे नमुने, विविध व्यक्तिरेखा महाभारतातून आपल्याला सतत भेटत राहातात. महाभारताचे हे भारतीयत्व आसेतुहिमाचल सर्वत्र आढळते. भगवान श्रीकृष्णाच्या गोड लीलांचे आणि त्याच्या पराक्रमाचे वर्णन करताना व्यासांनी मानवी भावभावनांची कितीतरी मनोहरी चित्रणे श्रीमद् भागवतात जाता जाता दाखविली आहेत.

व्यासांनी महाभारतानंतर भागवत लिहिले, पुराणे लिहिली, नीतिशास्त्राचे केवळ नियम सांगण्याऐवजी या बऱ्यावाईट शुभाशुभ भावभावनांचे मधुमधुर नर्तन आणि रौद्रभीषण तांडव विविध पौराणिक कथांतून आणि ऐतिहासिक घटनांतून त्यांनी आपणासमोर मूर्तिमंत उभे केले. नव्या पिढीने जुन्या पिढीपेक्षा अधिक उन्नत व्हावे, आयुष्याच्या वाटचालीत त्यांना महत्त्वाचे खाचखळगे आणि चढउतार विनासायास जाणून घेता यावेत आणि तेही मनोरंजक कथेच्या माध्यमातून समजावेत, हा कोणत्याही काळच्या शिक्षणशास्त्राला, कोणत्याही ठिकाणच्या गुरू-शिष्य परंपरेला आदरणीय वाटावा, असा थोर कित्ता व्यासांनी आपणासमोर ठेवला. व्यास हे गुरूजनांत सर्वश्रेष्ठ होत. आजच्या दिवशी कोणाही गुरूला केलेला नमस्कार गुरूकुल परंपरेचे परमपितामह महर्षी व्यासांनाच पोहोचत असतो.

◆◆◆●◆◆◆

No comments:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर