शाळा निवडायची कशी ?
आपल्या मुलांचा शाळाप्रवेश ही पालकांसाठी महत्त्वाची बाब असते. मात्र कोणत्या शाळेत घालावे, कोणत्या माध्यमात, कोणत्या बोर्डात घालावे, असे अनेक प्रश्न पालकांसमोर असतात. या शाळाप्रवेशाच्या वेळी पालकच गोंधळतात, अशी स्थिती असते. याबाबत पालकांना केलेले मार्गदर्शन…..
आपल्या मुलामुलींचा शाळेतील प्रवेश हा प्रत्येक पालकासमोरील गहन प्रश्न असतो. पालकांसाठी ही आयुष्यातली सर्वात मोठी कसोटी असते. पालक आपापल्या परीने तयारी सुरू करतात. शाळांची चौकशी सुरू होते. इथे पालक गोंधळतात. शाळेत प्रवेश घेण्याआधी पालकांनी आपापसात विचार विनिमय व उपलब्ध शाळांचा अभ्यास, विश्लेषण करणे आवश्यक आहे. त्यासाठी पालकांनी स्वत:चा निकष, कसोट्या लावण्याची गरज आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, केवळ शाळांच्या वेबसाइटला भेट देऊन आपले मत बनवू नये. हा विषय अधिक समजून घेण्यासाठी आपण शाळा निवडीचा १०० गुणांचा तक्ता तयार करू या. या तक्त्यामध्ये १० निकष असतील तसेच समजूतीकरता प्रत्येक निकषाला १० गुण देऊ या. व्यक्तीगत पातळीवर आपण हे गुणांचे मूल्यांकन, आपापल्या व्यक्तीगत विचाराप्रमाणे लावू शकता.
१. माध्यम : जगातील सर्व शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत, बालमानस तज्ज्ञ हे सर्व एकमताने मातृभाषेतील शिक्षण हे मुलांसाठी लाभदायक असते, हे वारंवार सांगत आले आहेत. तरीसुद्धा इंग्रजी माध्यमांच्या शाळेची मागणी वाढत आहे. या विषयाला अनेक कंगोरे आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या विचारानुसार माध्यम निवडणे हे चांगले.
२. परिसरातली शाळा : शहरातील वाहतूक आणि सुरक्षितता यांची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. यासाठी नेबरहूड स्कूल ही संकल्पना आता जगभर रूढ होत आहे. मुलांचा शाळेत जाण्या-येण्यास लागणारा वेळ आणि त्यामुळे होणारी त्यांची शारीरिक आणि मानसिक दमणूक, शाळेत काही कारणासाठी थांबावे लागल्यास निर्माण होणारा वाहतुकीचा प्रश्न या सर्वांचा विचार केल्यास मुलांची शाळा शक्यतो आपल्या परिसरातली असावी.
३. संग्लन अभ्यास मंडळ: शाळेत राबविला जाणारा अभ्यासक्रम, अध्यापन शास्त्र, अध्यापन पद्धत आणि हे सर्व ज्या शिक्षण मंडळाशी संग्लन असेल ते मंडळ [बोर्ड] हे पाल्याच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी अतिशय महत्त्वाचे असते.
आपल्याकडे १] एसएससी बोर्ड २] सीबीएससी , ३] आयसीएससी आणि ४] जीआयएसबी. [ इंटरनॅशनल स्कूलिंग] यांचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. पालकांनी आपल्या पाल्याच्या गरजेप्रमाणे विचार करून, शैक्षणिक अभ्याक्रम निवडावा. यामध्ये सीबीएससीचा अभ्यासक्रम देशभर उपलब्ध असल्याने जास्त लोकप्रिय आहे.
४. भौतिक साधन सुविधा : यामध्ये प्राथमिक साधन सुविधा म्हणजे सुरक्षित इमारत व विद्यार्थ्यांच्या संख्येस पुरेसे असणारे क्रीडांगण व खेळ सुविधा, वर्गात पुरेसा उजेड, खेळती हवा व वर्गातील मुलांच्या संख्येने तुलनात्मक क्षेत्रफळ, पुरेशी स्वच्छ स्वच्छतागृहे. मुलांमुलींसाठी वेगवेगळी स्वच्छतागृहे यांचा समावेश होतो. तर शैक्षणिक साधन सुविधांमध्ये ग्रंथालय, प्रयोगशाळा व इतर शैक्षणिक साधनांचा अंतर्भाव होतो. त्याचप्रमाणे आहेत त्या सुविधांचा विद्यार्थ्यांना कितपत उपयोग होतो, हे महत्त्वाचे आहे.
५. आर्थिक भार : अनेकदा एखाद्या शाळेत प्रवेश घेणे सोपे असते. परंतु दरवर्षी वाढणारे शुल्क व इतर खर्च याचे भान पालकांना प्रवेश घेताना नसते. नंतरच्या वर्षात ते जाणवू लागते. पण तोपर्यंत परतीची वाट बंद झालेली असते. अशा प्रसंगात व्यवस्थापनावर ताशेरे ओढून किंव्हा लढा देऊन काहीही उपयोग नसतो.
६. शिक्षक गुणवत्ता व मानसिकता: आजच्या आधुनिक काळातसुध्दा विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याचे सर्वात महत्त्वाचे साधन हे शिक्षकच आहेत. शाळेतील शिक्षकाची सर्वसाधारण गुणवत्ता ही यशस्वी शाळेची खूणगाठ आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. आधुनिक शिक्षण शास्त्रात शिक्षक हा केवळ शिक्षक न राहता विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक, [फिलोसॉफर आणि गाईड] असतो. शाळेतील शिक्षकांच्या शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच त्यांची मानसिकता हा पण महत्त्वाचा घटक आहे. शाळेतील शिक्षकांची प्रयोगशिलता, शिकण्याचा आणि शिकवण्यातील उत्साह हे सर्व विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे असतात. या सर्व गोष्टींबरोबर शिक्षक या शाळेत समाधानी आहेत की नाहीत, ते त्यांना मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्यावर ठरत असते.
७. संस्थेचा इतिहास आणि परंपरा : प्रवेश घेणारी शाळेची पालक संस्था किती जुनी आहे, तिचा इतिहास व कामगिरी कशी आहे, समाजात संस्थेचे नाव किती आहे, याचा पालकांनी विचार करणे आवश्यक आहे.
८. वर्तमान व्यवस्थापन : संस्थेचा इतिहास आणि परंपरा निश्चितच संस्थेबद्दल विशेष माहिती देत असतात. तरीही संस्थेची सध्याची परिस्थिती लक्षात घेणेही तेवढेच आवश्यक आहे. त्याचबरोबर वर्तमान व्यवस्थापनातील व्यक्तींचे समाजातले स्थान, त्यांचे एकंदरीत शिक्षण, सामाजिक आणि आर्थिक धोरण हे सर्व निकषाचे मानदंड आहेत
९. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग : यामध्ये ई-लर्निंग सुविधा याचबरोबर प्रशासनात आणि संपर्कासाठी किती प्रमाणात आधुनिक संगणकीय पध्दतीचा वापर केला जातो, याची माहिती करून घेणे गरजेचे आहे.
१०. पालक, शिक्षक आणि व्यवस्थापन यांचे एकमेकातील स्नेहसंबंध आणि विश्वास : व्यवस्थापन पालक संबंध या संदर्भातली व्यवस्थापनाचे धोरण व वागणूक कितपत संवेदनशील आहे, हे सर्व घटक शाळेतील आनंददायी वातावरणाला मदत करत असतात.
११. कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास : बहुतेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणकौशल्याची वाढ व्हावी, यासाठी प्रयत्न केले जातात. काही शाळा विशिष्ट गुणकौशल्य जोपासतात. काही शाळा शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा या क्षेत्रांना वेगवेगळे प्राधान्य देतात. आपल्या पाल्याची आवड आणि जीवन विकास कौशल्याबद्दल पालकांनी सजग असणे आवश्यक आहे.
१२. शाळेतील संस्कृती व शिस्त: आपण ज्या शाळेत आपल्या पाल्यास प्रवेश घेत आहोत, त्या शाळेची एकूणच संस्कृती आपल्या संस्कृतीशी मिळतीजुळती आहे की नाही, हे पालकांनी मोकळ्या मनाने जाणून घेतले पाहिजे. नाही तर यामध्ये पाल्याचा म्हणजे विद्यार्थ्यांचा मानसिक संघर्ष होऊ शकतो. शाळेतील आणि घरातील संस्कारात आणि संस्कृतीमध्ये विरोधाभास असेल, तर विद्यार्थ्यांची मानसिक कुचंबणा होऊ शकते.
(लेखक जिज्ञासा ट्रस्ट, ठाणे या संस्थेचे कार्यकारी विश्वस्त आहेत.)
संदर्भ व सौजन्य : महाराष्ट्र टाइम्स