● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

Saturday 25 May 2019

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें



पर्जन्यमानात घट झाल्याने जंगले ओसाड पडलीत. त्यात लोकसंख्या वाढीमुळे सगळ्या समस्या निर्माण झाल्या. मग घरासाठी जंगलतोड झाली आणि नवीनच सिमेंटची जंगले निर्माण झाली, त्यामुळे हवा गर्म झाली आणि हवेतील प्रदूषण अधिकच वाढले आहे, पण पूर्वी ही समस्या नव्हती. पर्यावरण हा शब्दच जन्माला आला नव्हता. तरीपण आपले पूर्वज असले पर्यावरण दिन पाळत नव्हते, तर ते प्रत्येक दिवशी आचरणात आणत असत. ते नुसतेच अरण्य रुदन करीत नसत तर निसर्गाशी जवळीक साधून असत. त्यांना कोणी झाडे लावायला सांगत नसत. उदाहरणार्थ आमचे आजोबा दरवर्षी किंवा षण्मासी राबत किंवा परडय़ात एकतरी झाड लावीत असत. आणि विशेष म्हणजे त्यांचा जीवापाड सांभाळ करीत. त्या झाडाला रोज एक तरी तांब्या पाणी घातल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. मोर्चा नाही, तज्ज्ञांचा लेख नाही तरी पर्यावरण दिन साजरा होत असे.

प्राचीन काळापासून आपल्याकडे वृक्षपूजा होत आली आहे. आयुष्यातला वानप्रस्थाश्रम त्यासाठीच होता. त्या काळात वनसंवर्धन आपोआप होत असे, त्याच प्रथा पुढे चालू आहेत. म्हणजे सध्या आपण वड, पिंपळ, उंबराची पूजा करतो त्याचं कारण पुढे त्याला धार्मिक पुराणकथा जोडल्या गेल्या, पण त्यामागचा हेतू आपण विसरलो. प्राचीन काळाच्या वाङ्मयात तर झाडाची निगा कशी करावी याचे उल्लेख आढळतात. काही झाडे किंवा झुडपे किती औषधी आहेत याची यादीच काही ठिकाणी आढळते. आयुर्वेदात तर त्यावर काही ग्रंथही आहेत, पण त्यामागे औषधोपचारांचा हेतूही होता. परंतु खरं वृक्षप्रेम हे विरळच होतं. म्हणजे वृक्षांवर मनापासून प्रेम करणारा माणूस क्वचितच सापडतो. संत साहित्यात, मात्र झाडाझुडपांवर प्रेम करणारे संत बरेच भेटतात. ते निसर्गाशी इतके समरस झालेला की ते वृक्षवल्लींना आपले नातेवाईकच मानतात. ज्ञानेश्वरांनी आपल्या उपमा, उत्प्रेक्षांच्या माध्यमातून निसर्गातील अनेक ‘घटिते वा सत्ये’ सांगितली आहेत. मूळ निसर्गाचा स्वभाव कसा सम्यक आहे हे सांगताना ते जळाची उपमा वा उदाहरण देतात. ते म्हणतात निसर्गातसुद्धा जळ म्हणते,

‘गाईची तृष्णा हरू। की व्याघ्रा विष होऊनि मारू। हा संभ्रम निसर्गात नसतो. पाणी तेरा रंग कैसा तर ज्यात मिळवाल त्यासारखा आपण गद्यात म्हणतो, परंतु ज्ञानेश्वर निसर्गातील जी निरीक्षणे काव्यातून सांगतात, ती पाहून आपण त्यांच्या प्रतिभेला दाद देतो, परंतु निसर्गाशी खरा समरस झाला तो महाकवी म्हणजे संत तुकाराम होय.

संत तुकाराम महाराजांना हल्ली जगद्गुरू तुकाराम ही पदवी दिली जाते. परंतु अशी पदवी तुकारामाने स्वीकारली नसती. शिवाजीराजाने एवढं राज्य आणि नजराणा दिला तरी त्यांनी स्वीकारला नाही. तुकाराम महाराज हे जगद्गुरू नव्हते. त्यांची लढाई त्यांच्याशीच होती. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग म्हणणारे तुकाराम महाराज हे स्वत:चाच शोध घेत होते, तरी ते लोकांपासून अलिप्त राहिले नाही. बाकीचे जगद्गुरू लोकांपासून अलिप्त राहतात. संत तुकाराम महाराज हे लोकांचा, लोकांकरिता आणि लोकांच्यासाठी लिहिणारे ख-या अर्थाने लोककवी होते. परंतु ते केवळ लोककवी नव्हते. निसर्गाशी समरस झालेले, निसर्गाशी नाते सांगणारे संतकवी होते. त्यामुळे ते म्हणतात :

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे। आळविती।।
येणे सुख रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष। अंगी येत।।

पशुपक्ष्यांशी सोयरिक जोडणारे हे संतकवी खरे पर्यावरणवादी होते. त्या काळी पर्यावरण हा शब्दही नसेल, पण निसर्गाची जाण होती. जेव्हा जेव्हा तुकाराम महाराज एकांतवासात देहूच्या डोंगरावर जात असत. तेव्हा ते त्या डोंगरावरील झाडांशी व पशुपक्ष्यांशी एवढा तादात्म्य पावत की ते वृक्षवेली पशुपक्षी हे बंधू सखा भगिनी, माता पिता सखी वाटत असत. त्यांच्याशी ते मग आपल्या मनातील सुखदु:ख व्यक्त करीत असत आणि मग निसर्गाच्या सहवासात त्यांना एकांतवासात जे परमसुख मिळे ते त्यांना मोक्षाचा आनंद देत असत. त्या आनंदात पक्षीही सुरात गाऊन त्यांना साथ देत असत, त्यात ते इतके तल्लीन होत की सारी संसाराची दु:खे विसरत असे.

वृक्षवल्ली हे आपलेच, कुटुंबीय आहेत असे मानणारे तुकारामासारखे इतरही संतकवी आपल्याला संत साहित्यात भेटतात. संत सावता माळी तर शेतात आलेल्या फळभाज्यांना आपले दैवत मानीत.

‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’ म्हणून निसर्गावर प्रेम करीतच त्यांनी आपला भक्तीचा मळा फुलविला होता. तर बाह्यरंगापेक्षा अंतरंग पाहा हे सांगणा-या चोखोबांनी :

‘ऊस डोंगा परि रस नव्हे डोंगा
काय भुललासि वरलिया रंगा’’ हे सांगून भक्ती रसात उसाचा गोडवा आणला. तव वृक्षवल्लींची उपमा देताना ‘‘मराठीचि वेलू गेला गगनावरी’ सांगताना त्यांनी निसर्गाशी नेहमीच जवळीक केली आहे. रामदासांचं तर इतकं बारीक निरीक्षण होतं की त्यांनी दासबोधामध्ये औषधी झाडांची यादीच दिली आहे. पशुपक्ष्यांसंबंधीचा संदर्भ देताना मुंगी उडाली आकाशी

तिने गिळीले सूर्याशी’ हे आगळे आध्यात्म सांगितले आहे. तर आईच्या प्रेमाचा महिमा सांगताना ‘‘घार उडते आकाशी। चित्त तिचे पिलापाशी’’ असं उदाहरण दिले आहे. आधुनिक मराठीत ख-या अर्थाने निसर्गाशी समरस झालेले एकमेव कवी म्हणजे बालकवी. त्यांनी सारा निसर्गच आपल्या कवितेत आणला. ते नुसते उपमा देत बसले नाहीत, तर निसर्गाच्या भाषेतूनच ते बोलत असत. मराठीत अनेकांनी निसर्ग कविता लिहिल्या आहेत. पण निसर्गाशी ख-या अर्थाने फक्त बालकवीच समरस झाले. त्यावेळी पर्यावरणाचा दिवस साजरा होत नसे किंवा झाडे लावा ही मोहीमही नसे. पण गावी आपल्या शेतात काम करताना शेतकरी एक तरी झाड लावीत असे, बांधावर झाड लावणे हा त्यांच्या शेतीचाच एक भाग होता.

खरं तर आपणा सगळ्यांनाच निसर्गाची आवड आहे. परंतु आपण आळस करतो आणि आपण दूरच्या नातेवाइकांना जसे विसरतो तसे निसर्गालाही विसरतो. पर्यटनामुळे हल्ली आम्ही वनसहली काढू लागलो आहोत, परंतु तेथे निसर्गाशी जवळीक साधण्यापेक्षा फक्त मौजमजा केली जाते. त्यामुळे उलट निसर्गाला त्रास होऊ लागला असून जंगलात कचरा आणि बाटल्यांचा खच पडू लागला.. निसर्गापासून काही न शिकता आपण त्यापासून केवळ आनंदाची अपेक्षा करतो.

झाडाचे संवर्धन हे ३६५ दिवस करणे हे खरे पर्यावरण! खरे पर्यावरण म्हणजे शहरातून जंगलात जाणे नव्हे तर जंगलाला आपल्या शहरात आणणे हे महत्त्वाचे आहे. केवळ एक दिवस रोप लावणे म्हणजे पर्यावरण दिन संपत नाही. आपल्या घराच्या अंगणात किंवा परसात दरवर्षी एकतरी झाड लावणे आणि ते वाढविणे म्हणजे पर्यावरण आयुष्यात पाळणे, एक झाड तोडले तर दोन झाडे लावा हा नियम आपण पाळत नाही. लहानपणी आम्ही शाळेत १५ ऑगस्टला झाडे लावीत असू. ती चळवळ आता पर्यावरण दिनात पाळली जात आहे. आता शाळेत गेलो तर हे झाड आपण लावले हे अभिमानाने सांगू शकतो. नुसते झाड लावणे महत्त्वाचे नाही त्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. म्हणून कविवर्य ग. दि. माडगुळकर म्हणतात,

हाती नाही बळ
दारी नाही आड
त्याने फुलझाड
लावू नये।।

---------//---------

No comments:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर