● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

Tuesday 31 July 2018

अण्णाभाऊ साठे

अण्णा भाऊ साठे

मराठी लेखक, शाहिर व समाज सुधारक

तुकाराम भाऊराव साठे (ऑगस्ट १इ.स. १९२० - जुलै १८इ.स. १९६९) हे अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. साठे एका अस्पृश्य मांग समाजामध्ये जन्मलेले एक दलित होते, आणि त्यांची उपज आणि ओळख त्यांचे लेखन आणि राजकीय कृतीशीलतेचे केंद्रबिंदू होते.

वैयक्तिक जीवन
अण्णाभाऊ साठेंचा जन्म १ ऑगस्ट इ.स. १९२० रोजी सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडीलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. साठे हे शाळेत शिकलेले नाही, केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तेथील सर्वणांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. त्यांनी दोन लग्न केलीत, त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी जयवंता साठे ह्या होत. त्यांना एकूण तीन अपत्ये होती - मधुकर, शांता आणि शकुंतला.

लेखन
साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये फकिरा (१९५९) समाविष्ट आहे, जी १९व्या आवृत्तीत आहे आणि इ.स. १९६१ मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. साठेंच्या लघु कथांचा संग्रह १५ आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि २७ अ-भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, १२ पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील १० गाणी लिहिली.

साठेंच्या पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरामध्ये, साठेंनी आपल्या समुदायाला पूर्ण भुखमरीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढिवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरूद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकिराला चित्रित केले.नायक आणि त्याच्या समुदायाला नंतर ब्रिटिश अधिकारी द्वारे अटक आणि छळ दिला जातो, आणि अखेरीस फकिराला फाशी देऊन ठार मारले जाते.
मुंबई मधील शहरी पर्यावरणाने त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला, जे याला डायस्टोपियन परिवाराच्या रूपात दर्शवतात. आरती वाणीने त्यांच्या दोन गाण्यातून - "मुंबईची लावणी" आणि "मुंबईचा गिरणीकामगार" – दुर्व्यवहारी, शोषणकारी, असमान और अन्यायपूर्ण" असे शहराला दर्शवणारे वर्णन केले आहे.

राजकारण
साठे पहिल्यांदा कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित होते.डी.एन. गवंकर आणि अमर शेख या लेखकांसोबत ते लालबावटा कला पथक या तमाशा नाट्यप्रसाराचे सदस्य होते, ज्याने सरकारी निर्णयांना आव्हान दिले होते. ते १९४० च्या दशकामध्ये कार्यरत राहिले आणि तेविया अब्राम्स यांच्यानुसार, भारतातील साम्यवादाच्या आधी स्वातंत्र्याच्या नंतरची "१९५० च्या दशकातील सर्वात रोमांचक नाटकीय घटना" होती.
भारतीय स्वातंत्र्य्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबई येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्च्यातील घोषणा होती, "ये आझादी झूठी है, देश कि जनता भूखी है!" इंडियन पीपल्स थिएटर एसोसिएशनमध्येही ते एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते, जी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक सांस्कृतिक शाखा होती आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये, ज्याने भाषिक विभागातून वेगळे मराठीभाषी राज्य (बॉम्बे राज्य) निर्माण करण्याची मागणी केली होती.

साठे नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकींना अनुसरत दलित कार्याकडे वळले आणि दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला. इ.स. १९५८ मध्ये, बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी म्हटले की, "पृथ्वी ही शेषनागात्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे" यातून त्यांनी जागतिक संरचनांमध्ये दलित आणि कामगार वर्गांचे महत्त्व स्पष्ट केले. या काळातील बहुतांश दलित लेखकांच्या विपरित, साठेंचे कार्य बौद्ध धर्माऐवजी मार्क्सवादाच्या प्रभावाखाली होते.

त्यांनी म्हटले आहे की, "दलित लेखकांना सध्याच्या सांसारिक व हिंदू अत्याचारांपासून दलितांना मुक्त करणे आणि त्यांचे संरक्षक करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कारण दीर्घकालीन पारंपरिक श्रद्धांना त्वरित नष्ट केले जाऊ शकत नाहीत.

वारसा
साठे हे दलित समाजाचे विशेषत: मांग जातीचे प्रतीक बनले आहेत. १ ऑगस्ट २००१ रोजी भारतीय पोस्टाने विशेष ₹४ टपाल तिकिटावर साठेंचे चित्र ठेवले होते. पुण्यातील लोकशाहीर अण्णाभा साठे स्मारक आणि कुर्ला मधील एक उड्डाणपूल यासह अनेक इमारतींना त्यांचे नाव देण्यात आले आहे.


क्रांतिकारी विचार
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे


"आपला जन्मच लढण्यासाठी झाला आहे.जन्मताच आपण सैनिक म्हणुन जन्मास आलो.आपले दुख,दैन्य,लाचारी,दारिद्र्य,अवहेलना,अपमान हे आपणास लढण्याचे प्रशिक्षण देत असतात.जो याविरूद्ध लढत नाही तो षंढ ठरतो."


"जळणाऱ्या जळू द्यावे किंवा जाळणाऱ्याला जाळू द्यावे हे मानवतावादी साहित्यिकाला पाहणे अशक्य असते."


"घराघरात ज्ञानाची ज्योत पेटवा,समाज क्रांतीचे ध्वज  उभारा त्याशिवाय तुमची पिढी परिवर्तनशील होणार नाही"

  
"मला फक्त *लढा* मान्य आहे, आक्रोश, *रडगाणे* नाही"

  
"जो जगाला लाथ मारतो त्याचे जग पाय धरते व जो जगाच्या पाया पडतो, त्याला जग लाथ मारते."

  
"हे  श्रमिका, तू गुलाम नाहीस,तू या जगाचा वास्तव मालक आहेस.हे जग तुझ्या हातावर आहे."

  
◆◆●●◆◆

अण्णाभाऊ साठे

साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

तुकाराम भाऊराव साठे
(ऑगस्ट १, इ.स. १९२० - जुलै १८, इ.स. १९६९)

संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान खूप महत्त्वाचे आहे



तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला.
अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.
१९४४ ला त्यांनी `लाल बावटा` पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. `माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।।`ही त्यांची गाजलेली लावणी होती. अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्रध्यशक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला. १६ ऑगष्ट १९४७ साली “ये आझादी जुठी हे देश कि जनता भुकी हे” असा नारा शिवाजी पार्क वर दिला त्या दिवशी पावसाने रौद्र रूप धारण केले होते. मात्र, तरीही अण्णाभाऊ मागे हटले नाहीत.
अण्णा भाऊंनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यापकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आणि तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या  मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे. परंतु तिचीही योग्य नोंद तथाकथित समीक्षकांनी घेतली नाही. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली.


लोकमान्य टिळक


ध्येयवादी व्यक्तीमत्त्व लोकमान्य टिळक !

          

लोकमान्य बाळ गंगाधर : (२३ जुलै १८५६–१ ऑगस्ट १९२०)

‘इंग्रजांचे वर्चस्व असतांना भारतभूमीच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वहाणारी आणि तन, मन अन् धन उद्धारकार्यास अर्पण करणारी काही नररत्ने होऊन गेली. त्यांपैकी एक दैदिप्यमान रत्न म्हणजे बाळ गंगाधर टिळक. आपल्या भारतमातेच्या थोर सुपुत्रांचे स्मरण म्हणजे कर्तृत्वाच्या प्रेरणेचा अखंड स्रोत. त्यांच्या जीवनचरित्रातून आपल्याला नेहमीच बोध आणि मार्गदर्शन मिळत आलेले आहे. केवळ भारतीयांनाच नव्हे, तर जगातील सार्‍या मानवाला आपले हे सांस्कृतिक धन म्हणजे कुतूहलाचा विषय आहे. ‘लोकमान्य’ पदवी प्राप्त झालेल्या ध्येयवादी आणि चिकाटी व्यक्तीमत्त्वाची १ ऑगस्ट या दिवशी पुण्यतिथी साजरी केली जाते. त्यानिमित्त कणखर आणि जाज्ज्वल नेतृत्वाचा थोडक्यात परिचय करून घेऊया.


बालपण

        २३ जुलै १८५६ मध्ये रत्नागिरीला त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधरपंत होते. बाळ लहान असतांनाच त्याच्या आईचा देहान्त झाला. या पुत्राच्या प्राप्तीसाठी तिने उपवास आणि कठीण व्रत केले होते.  सूर्यदेवाच्या प्रसादाने जन्मलेल्या या बाळाने ब्रिटिश साम्राज्यशाहीचा अस्त घडवून आणला.

समवयस्क मुलांपेक्षा भिन्न प्रकृतीचा असणे

        बाळचे सारे शिक्षण घरीच झाले. कारण बाळ बुद्धीमान असला, तरी खट्याळपणामुळे शिक्षकांना आवडत नव्हता. बालपणापासूनच त्याचे विचार वेगळे आणि स्वतंत्र असत. आपल्या समवयस्क मुलांपेक्षा तो भिन्न प्रकृतीचा होता. एकदा शाळेत त्यांच्या गुरुजींनी गणित घातले. ‘पाच बकर्‍या १ कुरण २८ दिवसांत खातात, तर तेच कुरण २० दिवसांत किती बकर्‍या संपवतील ? बाळने उत्तर दिले, ‘गुरुजी, सात बकर्‍या.’ गुरुजी बाळाजवळ गेले आणि वही उचलून तीवर दृष्टी फिरवली. ‘वहीत उदाहरण उतरवून तरी घ्यायचे! कुठे सोडवले आहेस ?’ गुरुजींनी विचारले. ‘मी तोंडी करू शकतो, मग लिहिण्याची आवश्यकता काय ?’ बाळ तत्काळ म्हणाला. कितीतरी कठीण गणिते तो सहज सोडवत असे.

क्रांतीवीरांच्या कथा ऐकणे

        त्याला कहाण्या ऐकण्याचा भारी नाद होता. अभ्यास संपला की, बाळ आजोबांकडे स्वातंत्र्ययुद्धाच्या गोष्टी ऐकण्याकरिता धाव घेई. तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, झाशीची राणी या क्रांतीवीरांच्या कथा ऐकतांना तो उत्तेजित होत असे. ‘मोठा झाल्यावर मीही मातृभूमीची अशीच सेवा करीन’, हा विचार त्याच्या अंतःकरणात खोल रुजून बसला होता.

महाविद्यालयीन जीवन

         टिळकांची प्रकृती अशक्त आणि सुकुमार होती. अशाने देशाचे कार्य कसे होणार म्हणून त्यांनी प्रकृती बळकट करण्याचा निश्चय केला. महाविद्यालयाचे प्रथम वर्ष शरीर साधनेत निघून गेले. नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहार यांमुळे त्यांनी सर्व खेळांत प्रथम क्रमांक पटकावला. ते उत्तम मल्ल आणि पोहणारे म्हणून नावाजले. खिस्ताब्द १८७७ मध्ये टिळक बी.ए. झाले. त्यांना गणितात प्रथम वर्ग मिळाला. पुढे त्यांनी एल्.एल्.बी.चीही पदवी संपादन केली.

‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना

        दुहेरी पदवीधर (डबल ग्रॅज्युएट) झाल्याने, ब्रिटिश शासनात चांगल्या वेतनाची जागा मिळणे अशक्य नव्हते; परंतु लहानपणी ठरवल्याप्रमाणे स्वतःचे जीवन देशाला वाहून घ्यायचे त्यांनी निश्चित केले आणि त्याप्रमाणे पुढील पावले उचलली. या कामी त्यांना श्री. आगरकर यांचे पूर्ण सहकार्य लाभले. ज्या शिक्षणप्रणालीतून सिद्ध झालेले विद्यार्थी देशास उपयुक्त ठरू शकतील, अशा शिक्षण पद्धतीची योजना टिळक आणि आगरकर यांनी चालू केली. खिस्ताब्द १८८० मध्ये त्यांनी आपल्या सहकार्‍यांना घेऊन ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. टिळकांनी राष्ट्रीय शिक्षणाचा विस्तार करायचे ठरवले.

वृत्तपत्रांची आवश्यकता जाणून ‘केसरी’ आणि ‘मराठा’ साप्ताहिक चालू करणे

        शाळांमधून केवळ विद्याथ्र्यांनाच शिक्षण देता येत असे; परंतु आता प्रत्येक भारतीयास त्याच्या पारतंत्र्याचे स्वरूप समजावून सांगायचे होते. लोकांना संघटित करून वर्तमानस्थितीचे भान आणि कर्तव्याची जाण त्यांच्यात निर्माण करायची होती. ‘आहे, हे सर्व प्रभावीरीत्या करायचे, तर वृत्तपत्रांचीच आवश्यकता आहे’, असा विचार त्यांनी केला. त्यांनी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ साप्ताहिक चालू केले. काही दिवसांतच ही साप्ताहिके लोकप्रिय झाली. यामध्ये जनतेच्या दुःखाचे सविस्तर विवेचन आणि वास्तविक घटनांचा स्पष्ट उल्लेख असायचा. आपल्या अधिकारांसाठी लढण्याकरिता भारतीयांना सिद्ध केले जात होते. त्यांच्या भाषेमध्ये एवढे सामर्थ्य होते की, भ्याड व्यक्तीच्या ठायीही स्वातंत्र्याची लालसा निर्माण व्हावी. केसरीने इंग्रज सरकारच्या कित्येक अन्यायकारी गोष्टी उजेडात आणल्या. त्यामुळे शासनाने ‘केसरी’ला न्यायालयात खेचले आणि याचा परिणाम म्हणून टिळक अन् आगरकर यांना ४ मास सश्रम कारावासाची शिक्षा झाली.

गणेशोत्सव आणि शिवजन्मोत्सव या माध्यमांद्वारे लोकांना संघटित करणे

        खिस्ताब्द १८९० ते १८९७ ही सात वर्षे त्यांच्या आयुष्यात फार महत्त्वाची ठरली. टिळक आता राजकारण धुरंधर बनले. सामाजिक सुधारणांसाठी तर त्यांनी शासनाविरुद्ध लढाईच चालू केली. बालविवाहाला प्रतिबंध आणि विधवाविवाहाला संमती मिळावी; म्हणून त्यांनी सर्वांना आवाहन केले. गणेशोत्सव आणि शिवजन्मोत्सव या माध्यमांद्वारे लोकांना संघटित केले. मध्यंतरी त्यांची मुंबई विद्यापिठाच्या ‘फेलो’ या पदावर निवड झाली होती. याच वेळी त्यांनी ‘ओरायन’ हा ग्रंथ लिहिला.

प्लेगची महामारी पसरल्याने रुग्णालये उघडणे

        खिस्ताब्द १८९६ मध्ये भारतात मोठा दुष्काळ पडला, प्लेगची महामारी पसरली. त्यासाठी टिळकांनी रुग्णालये उघडली. स्वयंसेवकांच्या साहाय्याने रोग्यांची शुश्रुषा होऊ लागली. संपादकीय लेखातून दुष्काळ आणि महामारीत बळी पडलेल्या लोकांच्या संख्येचे आकडे निर्भयपणे प्रसिद्ध केले. शासनाकडून साहाय्य मागण्याचा आपला अधिकार असून त्यासंबंधी योग्य कार्यवाही व्हावी, यासाठी जनतेला सतर्क केले; पण शासन व्हिक्टोरियाराणीच्या राज्यारोहणाच्या हीरकजयंती महोत्सवाची सिद्धता करण्यात गुंग होते. शेवटी महामारीवरच्या नियंत्रणासाठी रँड नावाच्या अधिकार्‍याची नियुक्ती झाली; पण रँड हा महामारीपेक्षाही भयानक ठरला. भारतीय जनतेवर अत्याचार करण्यात त्याने कुठेही कसूर ठेवली नाही. त्याच्या या अत्याचारामुळे एका युवकाने त्याला गोळी घालून ठार केले. ‘या हत्येमागे टिळकांचा हात असावा’, या संशयाने खिस्ताब्द १८९७ मध्ये त्यांना कारागृहात डांबले.

कारागृहातील जीवन

         येथील जीवन म्हणजे साक्षात् नरकच होता. कोठडीत सदैव अंधःकार असायचा. घोंगड्यामध्ये असंख्य उवा आणि तेवढेच डास असायचे. जोडीला ढेकूणही. खायला कणकेच्या वाळूमिश्रित पोळ्या आणि घालायला जाडेभरडे कपडे. अधिकारी बंदीवानांना निर्दयपणे मारझोड करत आणि काम करवून घेत. टिळकांना नारळाच्या शेंडीपासून दोर वळण्याचे आणि चटई विणण्याचे काम देण्यात आले. जो काही थोडासा निवांत वेळ मिळे, त्यात ते वाचन आणि लेखन करीत. इथे त्यांनी ‘आक्र्टिक होम इन दी वेदाज्’ या ग्रंथाची रचना केली.

स्वदेशीचे आंदोलन साप्ताहिक आणि लेख यांद्वारे घराघरात पोहोचवणे

        खिस्ताब्द १८९८ मध्ये दीपावलीच्या दिवशी टिळक कारागृहातून सुटले. लोकांनी जागोजागी दीप उजळून आपला आनंद व्यक्त केला. पुण्यातील प्रमुख मार्गावरून त्यांना मिरवणुकीने सन्मानपूर्वक घरी आणण्यात आले. कारागृहातील कष्टांनी त्यांचे आरोग्य फार खालावले होते. मुक्ततेनंतर काही दिवसांतच त्यांची प्रकृती थोडी सुधारली; पण टिळक असे स्वस्थ थोडेच बसणार होते. याच वेळी गोखले, रानडे यांनी स्वदेशीचे आंदोलन छेडले होते. टिळकांनी आपल्या साप्ताहिकाद्वारे, लेखांच्या आधारे हा विचार घराघरात पोहोचवला.

राष्ट्राकरिता जीवन समर्पण

        स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण, हे पवित्र शब्द टिळकांनी लोकांना शिकवले. लोकांनी त्यांचा शस्त्रासारखा उपयोग केला. स्वदेशाविषयी प्रेम आणि पारतंत्र्याविषयी असंतोष निर्माण करण्याची क्रांती टिळकांनी केली. या सर्व कारवायांनी इंग्रज शासन चांगलेच चिडले आणि टिळकांवर खोटेनाटे आरोप लादून त्यांच्या हातात बेड्या ठोकल्या. न्यायालयात १४ वर्षेपर्यंत टिळक लढले. जनतेचा आवेश न्यून व्हावा; म्हणून शासनाने अत्यंत कठोर आणि निर्दय उपाय योजले. या दुष्ट कृत्यांमुळे टिळकांचे रक्त तापले आणि ‘देशाचे दुर्भाग्य’ या मथळ्याखाली त्यांनी केसरीमध्ये लेख लिहिला. त्यांनी लिहिले ‘देशात बॉम्बची निर्मिती होणे, हे देशाचे दुर्दैव होय; परंतु ते सिद्ध करून फेकण्यासारखी परिस्थिती निर्माण करण्यास शासनच उत्तरदायी आहे.’ त्यांच्या या जहाल लिखाणामुळे शासनाची पक्की निश्चिती झाली की, जोपर्यंत टिळक मोकळे आहेत, तोवर शासनाला धोका आहे. या लेखाविषयी देशद्रोहाचा आरोप लावून २४ जून १९०८ या दिवशी मुंबईला त्यांना पकडण्यात आले आणि ६ वर्षांची शिक्षा ठोठावली. या वेळी ते ५२ वर्षांचे होते. याच वेळी त्यांना मधुमेहाचा विकार जडला; परंतु त्यांनी पर्वा केली नाही. ब्रह्मदेशातील मंडालेच्या कारागृहात त्यांची रवानगी झाली. तेथे टिळकांची लहानशी लाकडी फळ्यांची खोली होती. सश्रम कारावासातून साधा कारावास अशी शिक्षेत घट करण्यात आली. त्यांना लेखन-वाचनाची सवलत मिळाली. इथेच त्यांनी ‘गीतारहस्य’ या ग्रंथाच्या लेखनाचे महान कार्य केले. एकान्त सुसह्य व्हावा; म्हणून ते सदैव लेखन आणि वाचन यांत दंग असत. ६ वर्षांचा कारावास समाप्त होईपर्यंत त्यांनी ४०० पुस्तकांचा संग्रह केला. ‘स्वयंशिक्षक’ मार्गदर्शिकांचा उपयोग करून त्यांनी जर्मन आणि प्रेंâच भाषेचे ज्ञान संपादन केले. वेळेअभावी जी कामे ते पूर्वी करू शकत नसत, त्याकडे ते आता लक्ष पुरवू लागले. सकाळी प्रार्थना, गायत्री मंत्र आणि अन्य वैदिक मंत्रांचा जप अन् अन्य धार्मिक कृत्ये ते करू लागले. ते मंडालेच्या कारावासात असतांनाच सत्यभामाबार्इंचा त्यांच्या पत्नीचा भारतात मृत्यू झाला.

‘होमरूल लीग’ची स्थापना

        ८ जून १९१४ या दिवशी मंडालेच्या कारागृहातून टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम चालू केले. काँग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते. त्यांना एकसंघ करण्यासाठी टिळकांनी फार प्रयत्न केले; परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनीच एक स्वतंत्र शक्तीमान संघटना निर्माण करण्याचे ठरवले. यालाच ‘होमरूल लीग’ असे म्हणतात. ‘स्वराज्यप्राप्ती’ हेच या लीगचे ध्येय होते. लोकांना संघटित ठेवण्यासाठी त्यांनी सतत प्रवास केला. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी गर्जना करणार्‍या या ‘भारताच्या नरसिंहाने’ आपले ऐन तारुण्य स्वार्थत्यागपूर्वक राष्ट्राकरिता वाहून देशांत नवजागृती निर्माण केली. या त्यांच्या घोषणेने देशाचा कानाकोपरा दुमदुमला. या घोषणेचा प्रभाव भारतीयांच्या मनावर पडू लागला. खिस्ताब्द १९१६ मध्ये त्यांना ६० वर्षे पूर्ण झाली. आता हळूहळू त्यांची प्रकृती ढासळू लागली. तरीही त्यांचे प्रयत्न चालूच राहिले. इंग्लंडमधील एक पत्रकार श्री. चिरोल भारतात आले आणि त्यांनी टिळकांच्या आंदोलनाचा अभ्यास केला. ‘चिरोल खटल्या’करिता त्यांना इंग्लंडला जावे लागले. तेथे १३ मास त्यांना वास्तव्य करावे लागले. त्या प्रकरणात त्यांना मूल्यवान वेळ आणि फार द्रव्य वेचावे लागले. परदेशातही त्यांनी शेकडो सभा गाजवल्या. होमरूल आंदोलन तीव्र केले.

जालियानवाला बाग हत्याकांड

        त्यानंतर जालियानवाला बाग हत्याकांड झाले. निर्दय शासनाने शेकडो निःशस्त्र नागरिकांना रानटी पद्धतीने ठार केले. हे वृत्त कानी पडताच टिळक भारतात परत आले आणि आपल्या मागण्या मान्य होईतोवर आंदोलन चालूच ठेवण्याचे त्यांनी लोकांना आवाहन केले.

देवाज्ञा

        टिळकांचे जीवन दिव्य होते. लोकांच्या सन्मानाला आणि श्रद्धेला ते प्रत्येक दृष्टीने पात्र होते. तन, मन आणि धन सर्व अर्पण करून त्यांनी देशसेवा केली. शरीर थकलेले असतांनाही त्यांचा लोकजागृतीसाठी सतत प्रवास, व्याख्याने हा कार्यक्रम चालूच होता. जुलै १९२० मध्ये त्यांची प्रकृती आणखीनच खालावली आणि १ ऑगस्टच्या प्रथम प्रहरी त्यांचा जीवनदीप मालवला. ही दुःखद वार्ता वार्‍यासारखी सर्व देशभर पसरली. आपल्या या प्रिय नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी जनतेचा महासागर लोटला. आपल्या प्रत्येक कृतीतून जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत देशाकरिता लढत राहिलेल्या ध्येयवादी थोर राष्ट्रभक्ताला आमचे विनम्र अभिवादन !’


◆●◆

लोकमान्य टिळक



लोकमान्य बाळ गंगाधर : (२३ जुलै १८५६–१ ऑगस्ट १९२०)

लोकमान्य टिळक केसरीचे संपादक आणि क्रीयाशील राजकीय नेते होते. परंतु या व्यापातूनही ते आपल्या आवडीच्या विषयासाठी व संशोधनासाठी वेळ काढत होते. त्यांनी अनेक विषयावर संशोधन करून ग्रंथ लिहिले होते.
महाराष्ट्राच्या सर्व भव्यदिव्य सद्गुणांचा एकत्र समुदाय म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्यांचे चरित्र सह्याद्रीच्या छातीचं आणि हिमालयाच्या उंचीचं आहे. त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ मध्ये रत्नागिरीला झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण तिथेच झालं. वडील गंगाधरपंत शिक्षण खात्यात डेप्युटी म्हणून नोकरी करत होते. त्यांनी मुलाचं नाव ठेवलं होतं केशव पण आईचं लाडकं नाव होतं बाळ. त्यामुळे सर्व भारताचे नेते होऊन ‘महाराज’ व ‘लोकमान्य’ होऊनही टिळक बाळच राहिले.
१८७२ मध्ये ते पुण्यात मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर बी. ए. ची परीक्षा पास झाले. घरी वडील तर शिक्षणशास्त्रीच होते. तर महाविद्यालयात विद्वान गुरूंकडून चांगले संस्कार घडले. जबर धारणाशक्ती, तीव्र स्मरणशक्ती, स्वच्छ विचार, अंगीकृत कार्यावर निष्ठा आणि त्यासाठी लागणारा वज्र निर्धार, सर्व विषयात द्रष्टे सावधपण ही टिळकांची वैशिष्टय़े होती. शाळा, कॉलेजचे सर्व विषय त्यांच्या आवडीचे होते. पण त्यातही गणित हा विषय त्यांच्या विशेष आवडीचा होता. गणितामुळे त्यांच्यात निरनिराळय़ा विषयांत संशोधन करण्याची वृत्ती विकसित झाली. गणिताप्रमाणेच संस्कृत विषयही त्यांच्या आवडीचा होता.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होण्याच्या आधीच टिळकांच्या आयुष्याची दिशा निश्चित झाली होती. विष्णुशास्त्री चिपळुणकरांसारख्या मान्यवर विद्वानांच्या संगतीत त्यांनी आपल्या मार्गावर पहिलं पाऊल टाकलं. आतापर्यंत लोकांना पारतंत्र्याची सवय लागली होती. स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य यातलं अंतरच त्यांना समजेनासं झालं होतं. म्हणून देशात जागृती झाली. समाज सुशिक्षित, सुसंस्कृत झाला तरच स्वातंत्र्याची किंमत त्यांना कळणार होती म्हणून खरीखुरी राष्ट्रीय जागृती होण्यासाठी चिपळुणकर टिळक आणि आगरकर यांनी राष्ट्रीय शिक्षण देणारी संस्था काढायची ठरवली.
त्याप्रमाणे १८८० साली ‘न्यू इंग्लिश स्कूलची’ स्थापना झाली. तिथेही त्या शाळेचे व्यवस्थापक शिक्षक झाले. त्याबरोबरच सर्वसामान्य लोकांपर्यंत राष्ट्रीय विचारधारा पोहोचण्यासाठी वर्तमानपत्र हे उत्तम माध्यम आहे असं त्यांच्या लक्षात आलं. ते जास्त परिणामकारक ठरणार आहे म्हणून केसरी हे मराठी वृत्तपत्र आणि मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केलं आणि टिळक आणि आगरकर यांचा राजकारणात प्रवेश झाला.
त्या काळात स्वातंत्र्य मिळविण्यासाठी देशात दोन प्रवाह होते. ब्रिटिशांच्या विरुद्ध सशस्त्र बंड करून स्वातंत्र्य मिळवावे अशा विचारांच्या क्रांतिकारकांनी आत्मार्पण करून ते हुतात्मे झाले होते. तर विचाराने लढा द्यावा असा दुसरा प्रवाह होता. ज्या काळात पाश्चात्य समाजात नवीन विचार, नवीन सुधारणा होत होत्या, त्या काळात हिंदुस्थानातील समाजजीवन मात्र अज्ञान आणि संकुचित मार्गात अडकले होते. त्यासाठी भारतीयांनी आधुनिक दृष्टी स्वीकारून प्रगती केली पाहिजे.
या दृष्टीने भारतातील विविध भागातील राजकीय संस्था, गट, व्यक्ती यांना एकत्र आणून राष्ट्राच्या आकांक्षा प्रकट व्हाव्या या उद्देशाने अखिल भारतीय राजकीय संघटना काँग्रेसची स्थापना होऊन २८ डिसेंबर १८८५ मध्ये मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये पहिले अधिवेशन भरले. भारतातील विविध प्रांतातून ७२ प्रतिनिधी या अधिवेशनासाठी आले होते. यातूनच नंतर त्याचे राष्ट्रव्यापी व्यासपीठ बनले आणि गुलामगिरी नष्ट करण्याचे आणि स्वातंत्र्य मिळविण्याचे ते प्रभावी साधन ठरले.
१८९६ मध्ये मुंबई इलाक्यामध्ये भीषण दुष्काळ पडला तेव्हा दुष्काळग्रस्तांना मदत करण्याची कायदेशीर जबाबदारी सरकारवर आहे यावर टिळकांनी भर दिला. प्रत्यक्ष पाहणी करून १५ डिसेंबर १८९६ च्या केसरीत टिळकांनी लिहिले, तुम्हाला या सरकारशी लढायचे असेल तर कायदेशीर मार्गानेच लढले पाहिजे. तरच आपले हक्क मिळतील. वेळ आली तर त्यासाठी गोळीबार सहन करण्याचीही तयारी ठेवली पाहिजे. या संघर्षात लोकांना मदत करणे हे पुढा-याचे कर्तव्य आहे. टिळक हे कायद्याच्या सर्व मर्यादा सांभाळून लिहीत. परंतु त्यांची भाषा जळजळीत असे. त्या भाषेमुळे लोक निर्भय बनले आणि सरकारी सत्तेला आव्हान देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात येऊ लागले.
राजकीय उद्दिष्टासाठी चळवळ करताना कायदेशीर हक्कांचा कसा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा हे टिळकांना पूर्ण माहीत होते. आणि अशा रितीने काम करताना टिळकांनी काँग्रेसच्या कार्याला व्यापक स्वरूप मिळवून दिले. केवळ प्रचार न करता तत्त्वे आचरणात आणली त्यामुळे लोकांना प्रेरणा मिळाली. आपल्या देशाची सेवा करण्यासाठी कोणतेही हाल सोसण्याची तयारी दाखवून अनेक वेळा तुरुंगवास पत्करून नेमस्तांच्या मार्गापेक्षा वेगळय़ा पण अधिक परिणामकारक मार्गाने काँग्रेसला नेण्याचे प्रयत्न केले. काँग्रेस ही स्वातंत्र्य मिळविण्याचे प्रभावी साधन व्हावे या उद्देशाने टिळकांनी केलेल्या कार्यामुळे काँग्रेसच्या कामात एक नवा आशय निर्माण झाला.
नेते एकत्र आल्यामुळे स्वातंत्र्य चळवळ सामर्थ्यवान बनणार नाही तर त्यासाठी सर्वसामान्य लोकांना जागृत करून सहभागी करून घेतले पाहिजे. ही राजकीय जागृती राष्ट्रपुरुषांच्या उत्सवातून करता येईल याची टिळकांना खात्री होती. म्हणून महाराष्ट्रात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव सुरू केला. या उत्सवाला सर्व जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एका वर्षी कोलकत्त्यातही हा उत्सव साजरा झाला. याच वेळी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. लोक उत्साहाने एकत्र येऊ लागले. श्रीगणेश ज्ञानाची, कलेची देवता म्हणून तिच्यासमोर सांस्कृतिक कार्यक्रम, मेळे, कसरती याबरोबरच विविध विषयांवर व्याख्याने होण्यासाठी राजरोस व्यासपीठाचीही सोय झाली. टिळकांना जे लिहून लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं त्यापेक्षा समोरासमोर बोलून दाखवता येऊ लागलं.
टिळकांच्या या उपक्रमामुळे सरकार अस्वस्थ होऊन त्यांच्या चळवळी थांबवून मुस्कटदाबी करण्याची संधी शोधत होते. आणि तशी संधी त्यांना १८९७ मध्ये पुण्याला प्लेग झाल्यावर मिळाली. लोकांवर इतके अत्याचार झाले की चाफेकर बंधू रँड आणि आयस्र्ट या जुलमी अधिका-यांचा खून करून फाशी गेले. तेव्हा टिळकांनी ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असा अग्रलेख लिहिला. हा लेख आणि त्यांचे पूर्वीचे लेख, भाषणे ही राजद्रोह आहेत असे ठरवून २९ जुलै १८९७ या दिवशी त्यांना अटक करून दीड वर्ष सक्त मजुरीची शिक्षा झाली. राजद्रोहासाठी सक्त मजुरीची शिक्षा भोगणारे टिळक हे भारताच्या प्रतिष्ठेचे आणि आकांक्षाचे प्रतीक बनले. लोकांच्या हृदयात त्यांना अढळ स्थान लाभले आणि ते लोकमान्य झाले. तुरुंगात त्यांना सामान्य गुन्हेगारांप्रमाणे वागवण्यात आले. दोन महिन्यांत त्यांचे ३० पौंड वजन कमी झाले. सर्व देशवासीयांना चिंता वाटू लागली.
लोकमान्य टिळक केसरीचे संपादक आणि क्रीयाशील राजकीय नेते होते. परंतु या व्यापातूनही ते आपल्या आवडीच्या विषयासाठी व संशोधनासाठी वेळ काढत होते. त्यांनी अनेक विषयांवर संशोधन करून ग्रंथ लिहिले होते. त्यांच्या गाढय़ा व्यासंगाविषयी आणि संशोधनाविषयी युरोपियन मान्यवर विद्वान त्यांना अतिशय मान देत प्रो. मॅक्समुल्कर यांनी एक निवेदन तयार करून त्यावर युरोपातील नामवंत संशोधकांच्या सह्या घेऊन ते भारत मंत्र्यांना सादर केले. त्यात टिळकांच्या मौलिक संशोधनाचा उल्लेख करून त्यांची सुटका करावी, अशी विनंती केली. अखेर ६ सप्टेंबर १८९८ या दिवशी त्यांची सुटका झाली.
टिळकांनी नेतृत्वावर टीका न करता चळवळीच्या पलीकडे नेणारा राजकीय कार्यक्रम हाती घेतला. लोकांना स्वराज्यासाठी फार मोठा त्याग आणि अग्निदिव्य करावे लागेल याची जाणीव करून दिली. त्यांचा सशस्त्र चळवळीशी प्रत्यक्ष संबंध नव्हता; परंतु केसरीतून प्रसिद्ध होणा-या लेखामुळे संतापून ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर खटला भरवण्याचे ठरवले आणि २४ जून १९०८ या दिवशी राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. टिळक दोषी आहेत असा बहुमताने निर्णय दिला. निकाल सांगण्यापूर्वी तुम्हाला काही सांगायचे आहे का असे न्यायमूर्तीनी विचारले तेव्हा शांत गंभीर स्वरात ते म्हणाले, ‘ज्युरीने मला दोषी ठरवले तर खुशाल ठरवो. मी निर्दोषी आहे.
कदाचित नियतीची इच्छा असेल की माझ्या शिक्षा भोगण्यामुळेच मी करत असलेल्या कार्याला ऊर्जितावस्था यावी. सहा वर्षाची शिक्षा देशाबाहेर भोगावी असा निकाल दिला. आणि ब्रह्मदेशात मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी सर्व वेळ वाचनात लेखनात घालवून ‘गीता रहस्य’ हा श्रेष्ठ तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ लिहिला. टिळकांच्या उदात्त राजकीय जीवनाची अखेर होमरूल चळवळीने झाली. असामान्य बुद्धिमत्ता लाभलेले, व्यासंगात रमणारे विद्वान पण त्याबरोबरच जनसामान्यात एकरूप झालेले लोकांना स्वातंत्र्य लढय़ात सामील होण्याची प्रेरणा देणारे लोकमान्य टिळक १ ऑगस्ट १९२० या दिवशी अनंतात विलीन झाले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर