● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

Sunday 30 September 2018

महात्मा गांधी

 राष्ट्रपिता महात्मा गांधी



ब्रिटीशांनी भारतावर दोनशे वर्षे राज्य केले, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सेनानीनी आपल्या घराचा त्याग केला, प्राणाची आहुती दिली. अशाच महान स्वातंत्र्य सेनानी पैकी एक म्हणजे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी.

महात्मा गांधी एक महान स्वतंत्र सैनिक होते, त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी खर्च केले. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातच्या पोरबंदरमधील हिंदू कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील करमचंद गांधी हे पोरबंदर राज्यात दिवाण म्हणून काम करत असत. त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई होते. त्यांना वाचनाची आवड होती, त्यांना गोष्टी वाचायला आवडत असे आणि त्या गोष्टी त्यांच्या मनावर खोलवर परिणाम ही करत असत. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजकोट मध्ये पूर्ण झाले. वयाच्या चौदाव्या वर्षी महात्मा गांधींचे लग्न तेरा वर्षीय कस्तुरबा कपाडिया यांच्याशी झाले, नंतर त्यांना कस्तुरबा गांधी म्हणून ओळखू जाऊ लागले. महात्मा गांधींच्या पत्नी कस्तुरबा गांधींनीही त्यांना विविध चळवळीमध्ये साथ दिली, गांधीजी जेलमध्ये असताना त्यांनी चळवळींचे अध्यक्षपद सुद्धा सांभाळले. त्यांनी महात्मा गांधीजींना शेवटपर्यंत साथ दिली, पुढे जाऊन पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये त्यांचा मृत्यू झाला.

१८८८ मध्ये महात्मा गांधी समलदास विद्यालयात दाखल झाले पण ते महाविद्यालय सोडून पोरबंदर ला परत आले. एका कौटुंबिक मित्राच्या सल्ल्यावरून ते कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लंडनला गेले आणि १८९१ मध्ये ते भारतात परत आले. ते लंडनमध्ये असतानाच त्यांच्या आईचा मृत्यू झाला पण त्याची बातमी त्यांना कुणीही कळवली नाही जेणेकरून त्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे. बॅरिस्टर बनून भारतात परत आल्यानंतर त्यांनी बॉम्बेमध्ये (मुंबई) वकिलीची सुरुवात केली. पण त्यामध्ये ते तेवढेसे यशस्वी झाले नाहीत म्हणून ते पोरबंदरला परतले. त्यावेळी त्यांना दक्षिण आफ्रिकेतून नोकरीची संधी मिळाली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेत जाण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेमध्ये तेव्हा नाटाल ब्रिटिश सरकार होते. तिथे भारतीय वंशाच्या लोकांना वर्णभेदाचा त्रास होत असे. या सर्व अनुभवातून महात्मा गांधींनी याबद्दल विरुद्ध लढा देण्याचे ठरवले. इथूनच महात्मा गांधींचा खरा प्रवास सुरू झाला. महात्मा ही पदवी त्यांना दक्षिण आफ्रिकेतच मिळाली.
गोपाळ कृष्णा गोखले यांच्या विनंतीला मान देऊन ते भारतात परत आले. १९१५ साली दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर त्यांनी स्थानिक शेतकरी आणि कामगार यांच्या उच्च कर आणि भेदभावाच्या विरोधात लढा देण्यास सुरुवात केली. पुढे १९२१ मध्ये ते राष्ट्रीय काँग्रेस मध्ये सहभागी झाले आणि तिथून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत आपले योगदान देण्यास सुरुवात केली. १९३० मध्ये काँग्रेसने स्वतंत्र भारताची घोषणा केली, पण ती ब्रिटिश राजने मान्य केली नाही पण काही वाटाघाटी करण्यात आल्या, ज्यानुसार भारतीयांना प्रांतीय सरकार मध्ये भाग घेण्यास परवानगी मिळाली. यादरम्यान महात्मा गांधीजींनी अनेक चळवळी, सत्याग्रह, आंदोलने केली. १९१७ मध्ये बिहारच्या चंपारण सत्याग्रहात त्यांना यश मिळाले. १९१८ मध्ये गांधीजींनी उच्च महसूलाविरुद्ध खेडामध्ये असहकार सत्याग्रह पुकारला. वल्लभभाई पटेल यांनी शेतकऱ्याचे प्रतिनिधित्व केले आणि ब्रिटिशांसोबत वाटाघाटी करून राजस्व संकलन निलंबित केले व सर्व कैद्यांना सोडवले. १९१९ मध्ये गांधीजींनी असहकार आंदोलन पुकारले. या दरम्यान जमलेल्या लोकांनी सर्वानजीक मालमतेची नासाडी केली. याच दरम्यान जालियनवाला बाग हत्याकांड झाले. लोकांकडून होणारी हिंसा थांबवण्यासाठी गांधीजी अमरण उपोषणाला बसले. त्यानंतर त्यांनी आपले लक्ष स्वदेशी मोहिमेकडे वळवले. ज्या नुसार त्यांनी परदेशी वस्तूवर बहिष्कार घातला, स्वदेशी खादीची वस्त्र वापरण्याचे आवाहन केले. या सोबत त्यांनी जनतेस ब्रिटिश सरकारच्या नोकऱ्या, पदव्यांचा बहिष्कार करण्याचे आवाहन केले. पुढे जाऊन हे असहकार आंदोलन वाढले, ब्रिटीशानी गांधीजींना ६ वर्षांची सजा सुनावली. या दरम्यान काँग्रेस मध्ये फूट पडू लागली. १९२४ मध्ये, २ वर्षानंतर गांधीजींना अॅपेन्डिसाइटिसच्या शश्त्रक्रियेसाठी सोडण्यात आले. पुढे त्यांनी आपला लढा चालू ठेवला. इंग्रजांशी लढा देताना महात्मा गांधींनी अहिंसा, असहकार आणि सत्याग्रहाचा वापर केला. बऱ्याच वेळा त्यांना अटक करून तुरुंगात ठेवण्यात आले, परंतु ते निराश न होता ब्रिटिशांविरुद्ध लढा चालू ठेवला. पुढे जाऊन त्यांनी विदेशी वस्तू त्यागल्या, ते फक्त खादीचे धोतर आणि शाल परिधान करत असत. १९३० मध्ये त्यांनी दांडी यात्रे द्वारा त्यांनी मिठावरच्या कराविरुद्ध सत्याग्रह पुकारले. १२ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान गांधीजी हजारो जनसमुदयासहअहमदाबाद ते दांडी अशी ३८८ किलोमीटरची पायी यात्रा केली. ब्रिटिशांनी या दरम्यान ६०,००० लोकांना जेल मध्ये टाकले. १९४२ मध्ये गांधीजींनी “भारत छोडो” अभियान सुरु केले. याच दरम्यान त्यांनी “करो या मरो” चा नारा दिला. ब्रिटीशानी त्यांना पुण्यातील आगा खान पॅलेस मध्ये नजरकैदेत ठेवले. या दरम्यान त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधींचे निधन झाले, आणि गांधीजींनाही मलेरिया झाला होता. गांधीजींना ६ मे १९४४ ला सोडण्यात आले. तेव्हा काँग्रेसचे राजनैतिक वातावरण बदलले होते, मुहम्मद अली जिन्नाह स्वतंत्र मुस्लिम देशाची मागणी करू लागले. ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधींनी आपल्या सर्व शक्तींचा उपयोग केला. त्यांनी जनतेच्या एकोप्याची शक्ती जाणली होती म्हणून त्यांनी विविध जाती, धर्म, समाज, वर्ण, वय किंवा लिंग सर्व मतभेद विसरून भारतीयांना स्वातंत्र्यासाठी एकत्र आणले. अखेरीस १५ ऑगस्ट १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रज भारत सोडून निघून गेले पण भारत आणि पाकिस्तान असे विभाजन करून. पण त्यांनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य पाहण्यासाठी ते खूप वर्ष जगू शकले नाहीत. ३० जानेवारी १९४८ ला नथुराम गोडसे नावाच्या युवकांनी त्यांची दिल्लीतील बिर्ला मंदिर येथे हत्या केली. महात्मा गांधी हे एक महान व्यक्तिमत्त्व होते त्यांनी आपले पूर्ण आयुष्य मातृभूमीसाठी अर्पण केले. त्यांनी दाखवून दिले की अहिंसा आणि सत्याग्रह या मार्गानेही देशाला स्वतंत्र मिळवून देता येते. त्यांची शिकवण आणि आयुष्य जगातील अनेक नेत्यांना प्रेरणादायी ठरले. महात्मा गांधी आपल्या शिकवणी आणि मार्गदर्शनाच्या रूपाने प्रत्येक भारतीयांच्या हृदयात आहेत. आपण त्यांचे बलिदान केव्हाच विसरू शकत नाही.

SOURCE : TEEN AT HEART

No comments:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर