● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

Monday 15 January 2018


संत एकनाथ

 ‘संत’ पदाला पोहोचलेले सत्पुरुष, उच्च कोटीचे समाजसुधारक, महान तत्त्ववेत्ता, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक अशा अनेक गुणविशेषणांसह ’ज्ञानाचा एका’ या बिरुदावलीने सा-‍या महाराष्ट्राला परिचित असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे संत एकनाथ!
आदर्श गृहस्थाश्रमी, मायमराठीचे सुपुत्र, व्युत्पन्नमति पंडित, दयेचा सागर या शब्दात त्यांचे वर्णन करता येईल. संत एकनाथ हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील सुप्रसिद्ध संत. जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे. यांचे मूळ पुरुष भास्करपंत कुलकर्णी, हे प्रतिष्ठान ऊर्फ पैठण नगरीत राहणारे होते. संत भानुदास हे त्यांचे पणजोबा. यांचे कुलदैवत सूर्यनारायण होते. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. दुर्दैवाने त्यांना आई-वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत. एकनाथांना लहानपणापासून अध्यात्म ज्ञानाची व हरिकीर्तनाची आवड होती.
एकनाथांचे गुरू सदगुरु जनार्दन स्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते. हे मूळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते महान दत्तोपासक होते. सदगुरु म्हणून संत एकनाथांनी यांना मनोमनी वरले होते. जनार्दनपंत हे विद्वान व सत्शील आचरणाचे होते. नाथांनी अथक परिश्रम करून गुरुसेवा केली. साक्षात् दत्तात्रयांनी त्यांना दर्शन दिले. आत्मबोध, पूर्णगुरुकृपा, आणि भगवंत दत्तात्रय यांचे दर्शन यांमुळे नाथांचे जीवन धन्य झाले. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या. गुरुंकडूनच एकनाथांनी वेदांत, योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान आणि वेदाध्ययनात घालवला. गुरूंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला.
नाथांनी सदगुणी, सुलक्षणी मुलीशी म्हणजेच गिरीजाशी विवाह केला. ही मुलगी पैठणजवळच्या वैजापूरची होती. त्यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा होता. त्यांचा मुलगा हरिपंडित या नावाने प्रसिध्द झाला, परंपरेचा अतिशय अभिमानी होता. कवी मुक्तेश्र्वर हे नाथांचे नातू होत.
संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी नाथांचा जन्म झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती. यवनांचे राज्य होते. याच दरम्यान विजयनगरचे हिंदू साम्राज्य बुडाले होते. स्वधर्म, स्वराष्ट्र, स्वराज्य यांविषयी सर्वत्र अज्ञानाचे वातावरण होते. कर्मकांड, कर्मठपणा यावर जास्त भर होता. भर दिवसा स्त्रिया बाटविल्या जात होत्या. धर्मावर अत्याचार होत होता. अशा बिकट समयी नाथांनी समाज सुधारण्यासाठी जगदंबेला साद घातली. ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. संत एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. रंजन व प्रबोधन करत अध:पतित समाजाला त्यांनी सन्मार्गावर आणले, महाराष्ट्राचा पुरुषार्थ जागविला. ते ’ऐका जनार्दन’ म्हणून स्वत:चा उल्लेख करत. ऐका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे. त्यांनी संत ज्ञानेश्वरांचे आळंदी येथील समाधीस्थळाचा शोध घेतला.
अनेक रचना, अभंग, गवळणी असे स्फुट लेखन एकनाथांनी केले. ’एकनाथी भागवत’ हा त्यांचा ग्रंथ लोकप्रिय आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. ह्यात एकूण १३६७ श्र्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. हे अतिशय प्रासादिक (व्यासकृत) काव्य आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. त्यांचे रुक्मिणीस्वयंवर अत्यंत लोकप्रिय आहे. नाथांची दत्ताची आरतीही (त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाणा) प्रसिद्ध आहे. या महात्म्याने विपुल वाङ्मय निर्माण करून मराठी भाषा समृद्ध केली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते. दत्तभक्त होते, देवीभक्त पण होते. जातीभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (इ.स. १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला व अनंतात विलिन झाले.

No comments:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर