● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

Tuesday, 31 July 2018

लोकमान्य टिळक



लोकमान्य बाळ गंगाधर : (२३ जुलै १८५६–१ ऑगस्ट १९२०)

लोकमान्य टिळक केसरीचे संपादक आणि क्रीयाशील राजकीय नेते होते. परंतु या व्यापातूनही ते आपल्या आवडीच्या विषयासाठी व संशोधनासाठी वेळ काढत होते. त्यांनी अनेक विषयावर संशोधन करून ग्रंथ लिहिले होते.
महाराष्ट्राच्या सर्व भव्यदिव्य सद्गुणांचा एकत्र समुदाय म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्यांचे चरित्र सह्याद्रीच्या छातीचं आणि हिमालयाच्या उंचीचं आहे. त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ मध्ये रत्नागिरीला झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण तिथेच झालं. वडील गंगाधरपंत शिक्षण खात्यात डेप्युटी म्हणून नोकरी करत होते. त्यांनी मुलाचं नाव ठेवलं होतं केशव पण आईचं लाडकं नाव होतं बाळ. त्यामुळे सर्व भारताचे नेते होऊन ‘महाराज’ व ‘लोकमान्य’ होऊनही टिळक बाळच राहिले.
१८७२ मध्ये ते पुण्यात मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर बी. ए. ची परीक्षा पास झाले. घरी वडील तर शिक्षणशास्त्रीच होते. तर महाविद्यालयात विद्वान गुरूंकडून चांगले संस्कार घडले. जबर धारणाशक्ती, तीव्र स्मरणशक्ती, स्वच्छ विचार, अंगीकृत कार्यावर निष्ठा आणि त्यासाठी लागणारा वज्र निर्धार, सर्व विषयात द्रष्टे सावधपण ही टिळकांची वैशिष्टय़े होती. शाळा, कॉलेजचे सर्व विषय त्यांच्या आवडीचे होते. पण त्यातही गणित हा विषय त्यांच्या विशेष आवडीचा होता. गणितामुळे त्यांच्यात निरनिराळय़ा विषयांत संशोधन करण्याची वृत्ती विकसित झाली. गणिताप्रमाणेच संस्कृत विषयही त्यांच्या आवडीचा होता.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होण्याच्या आधीच टिळकांच्या आयुष्याची दिशा निश्चित झाली होती. विष्णुशास्त्री चिपळुणकरांसारख्या मान्यवर विद्वानांच्या संगतीत त्यांनी आपल्या मार्गावर पहिलं पाऊल टाकलं. आतापर्यंत लोकांना पारतंत्र्याची सवय लागली होती. स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य यातलं अंतरच त्यांना समजेनासं झालं होतं. म्हणून देशात जागृती झाली. समाज सुशिक्षित, सुसंस्कृत झाला तरच स्वातंत्र्याची किंमत त्यांना कळणार होती म्हणून खरीखुरी राष्ट्रीय जागृती होण्यासाठी चिपळुणकर टिळक आणि आगरकर यांनी राष्ट्रीय शिक्षण देणारी संस्था काढायची ठरवली.
त्याप्रमाणे १८८० साली ‘न्यू इंग्लिश स्कूलची’ स्थापना झाली. तिथेही त्या शाळेचे व्यवस्थापक शिक्षक झाले. त्याबरोबरच सर्वसामान्य लोकांपर्यंत राष्ट्रीय विचारधारा पोहोचण्यासाठी वर्तमानपत्र हे उत्तम माध्यम आहे असं त्यांच्या लक्षात आलं. ते जास्त परिणामकारक ठरणार आहे म्हणून केसरी हे मराठी वृत्तपत्र आणि मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केलं आणि टिळक आणि आगरकर यांचा राजकारणात प्रवेश झाला.
त्या काळात स्वातंत्र्य मिळविण्यासाठी देशात दोन प्रवाह होते. ब्रिटिशांच्या विरुद्ध सशस्त्र बंड करून स्वातंत्र्य मिळवावे अशा विचारांच्या क्रांतिकारकांनी आत्मार्पण करून ते हुतात्मे झाले होते. तर विचाराने लढा द्यावा असा दुसरा प्रवाह होता. ज्या काळात पाश्चात्य समाजात नवीन विचार, नवीन सुधारणा होत होत्या, त्या काळात हिंदुस्थानातील समाजजीवन मात्र अज्ञान आणि संकुचित मार्गात अडकले होते. त्यासाठी भारतीयांनी आधुनिक दृष्टी स्वीकारून प्रगती केली पाहिजे.
या दृष्टीने भारतातील विविध भागातील राजकीय संस्था, गट, व्यक्ती यांना एकत्र आणून राष्ट्राच्या आकांक्षा प्रकट व्हाव्या या उद्देशाने अखिल भारतीय राजकीय संघटना काँग्रेसची स्थापना होऊन २८ डिसेंबर १८८५ मध्ये मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये पहिले अधिवेशन भरले. भारतातील विविध प्रांतातून ७२ प्रतिनिधी या अधिवेशनासाठी आले होते. यातूनच नंतर त्याचे राष्ट्रव्यापी व्यासपीठ बनले आणि गुलामगिरी नष्ट करण्याचे आणि स्वातंत्र्य मिळविण्याचे ते प्रभावी साधन ठरले.
१८९६ मध्ये मुंबई इलाक्यामध्ये भीषण दुष्काळ पडला तेव्हा दुष्काळग्रस्तांना मदत करण्याची कायदेशीर जबाबदारी सरकारवर आहे यावर टिळकांनी भर दिला. प्रत्यक्ष पाहणी करून १५ डिसेंबर १८९६ च्या केसरीत टिळकांनी लिहिले, तुम्हाला या सरकारशी लढायचे असेल तर कायदेशीर मार्गानेच लढले पाहिजे. तरच आपले हक्क मिळतील. वेळ आली तर त्यासाठी गोळीबार सहन करण्याचीही तयारी ठेवली पाहिजे. या संघर्षात लोकांना मदत करणे हे पुढा-याचे कर्तव्य आहे. टिळक हे कायद्याच्या सर्व मर्यादा सांभाळून लिहीत. परंतु त्यांची भाषा जळजळीत असे. त्या भाषेमुळे लोक निर्भय बनले आणि सरकारी सत्तेला आव्हान देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात येऊ लागले.
राजकीय उद्दिष्टासाठी चळवळ करताना कायदेशीर हक्कांचा कसा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा हे टिळकांना पूर्ण माहीत होते. आणि अशा रितीने काम करताना टिळकांनी काँग्रेसच्या कार्याला व्यापक स्वरूप मिळवून दिले. केवळ प्रचार न करता तत्त्वे आचरणात आणली त्यामुळे लोकांना प्रेरणा मिळाली. आपल्या देशाची सेवा करण्यासाठी कोणतेही हाल सोसण्याची तयारी दाखवून अनेक वेळा तुरुंगवास पत्करून नेमस्तांच्या मार्गापेक्षा वेगळय़ा पण अधिक परिणामकारक मार्गाने काँग्रेसला नेण्याचे प्रयत्न केले. काँग्रेस ही स्वातंत्र्य मिळविण्याचे प्रभावी साधन व्हावे या उद्देशाने टिळकांनी केलेल्या कार्यामुळे काँग्रेसच्या कामात एक नवा आशय निर्माण झाला.
नेते एकत्र आल्यामुळे स्वातंत्र्य चळवळ सामर्थ्यवान बनणार नाही तर त्यासाठी सर्वसामान्य लोकांना जागृत करून सहभागी करून घेतले पाहिजे. ही राजकीय जागृती राष्ट्रपुरुषांच्या उत्सवातून करता येईल याची टिळकांना खात्री होती. म्हणून महाराष्ट्रात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव सुरू केला. या उत्सवाला सर्व जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एका वर्षी कोलकत्त्यातही हा उत्सव साजरा झाला. याच वेळी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. लोक उत्साहाने एकत्र येऊ लागले. श्रीगणेश ज्ञानाची, कलेची देवता म्हणून तिच्यासमोर सांस्कृतिक कार्यक्रम, मेळे, कसरती याबरोबरच विविध विषयांवर व्याख्याने होण्यासाठी राजरोस व्यासपीठाचीही सोय झाली. टिळकांना जे लिहून लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं त्यापेक्षा समोरासमोर बोलून दाखवता येऊ लागलं.
टिळकांच्या या उपक्रमामुळे सरकार अस्वस्थ होऊन त्यांच्या चळवळी थांबवून मुस्कटदाबी करण्याची संधी शोधत होते. आणि तशी संधी त्यांना १८९७ मध्ये पुण्याला प्लेग झाल्यावर मिळाली. लोकांवर इतके अत्याचार झाले की चाफेकर बंधू रँड आणि आयस्र्ट या जुलमी अधिका-यांचा खून करून फाशी गेले. तेव्हा टिळकांनी ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असा अग्रलेख लिहिला. हा लेख आणि त्यांचे पूर्वीचे लेख, भाषणे ही राजद्रोह आहेत असे ठरवून २९ जुलै १८९७ या दिवशी त्यांना अटक करून दीड वर्ष सक्त मजुरीची शिक्षा झाली. राजद्रोहासाठी सक्त मजुरीची शिक्षा भोगणारे टिळक हे भारताच्या प्रतिष्ठेचे आणि आकांक्षाचे प्रतीक बनले. लोकांच्या हृदयात त्यांना अढळ स्थान लाभले आणि ते लोकमान्य झाले. तुरुंगात त्यांना सामान्य गुन्हेगारांप्रमाणे वागवण्यात आले. दोन महिन्यांत त्यांचे ३० पौंड वजन कमी झाले. सर्व देशवासीयांना चिंता वाटू लागली.
लोकमान्य टिळक केसरीचे संपादक आणि क्रीयाशील राजकीय नेते होते. परंतु या व्यापातूनही ते आपल्या आवडीच्या विषयासाठी व संशोधनासाठी वेळ काढत होते. त्यांनी अनेक विषयांवर संशोधन करून ग्रंथ लिहिले होते. त्यांच्या गाढय़ा व्यासंगाविषयी आणि संशोधनाविषयी युरोपियन मान्यवर विद्वान त्यांना अतिशय मान देत प्रो. मॅक्समुल्कर यांनी एक निवेदन तयार करून त्यावर युरोपातील नामवंत संशोधकांच्या सह्या घेऊन ते भारत मंत्र्यांना सादर केले. त्यात टिळकांच्या मौलिक संशोधनाचा उल्लेख करून त्यांची सुटका करावी, अशी विनंती केली. अखेर ६ सप्टेंबर १८९८ या दिवशी त्यांची सुटका झाली.
टिळकांनी नेतृत्वावर टीका न करता चळवळीच्या पलीकडे नेणारा राजकीय कार्यक्रम हाती घेतला. लोकांना स्वराज्यासाठी फार मोठा त्याग आणि अग्निदिव्य करावे लागेल याची जाणीव करून दिली. त्यांचा सशस्त्र चळवळीशी प्रत्यक्ष संबंध नव्हता; परंतु केसरीतून प्रसिद्ध होणा-या लेखामुळे संतापून ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर खटला भरवण्याचे ठरवले आणि २४ जून १९०८ या दिवशी राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. टिळक दोषी आहेत असा बहुमताने निर्णय दिला. निकाल सांगण्यापूर्वी तुम्हाला काही सांगायचे आहे का असे न्यायमूर्तीनी विचारले तेव्हा शांत गंभीर स्वरात ते म्हणाले, ‘ज्युरीने मला दोषी ठरवले तर खुशाल ठरवो. मी निर्दोषी आहे.
कदाचित नियतीची इच्छा असेल की माझ्या शिक्षा भोगण्यामुळेच मी करत असलेल्या कार्याला ऊर्जितावस्था यावी. सहा वर्षाची शिक्षा देशाबाहेर भोगावी असा निकाल दिला. आणि ब्रह्मदेशात मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी सर्व वेळ वाचनात लेखनात घालवून ‘गीता रहस्य’ हा श्रेष्ठ तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ लिहिला. टिळकांच्या उदात्त राजकीय जीवनाची अखेर होमरूल चळवळीने झाली. असामान्य बुद्धिमत्ता लाभलेले, व्यासंगात रमणारे विद्वान पण त्याबरोबरच जनसामान्यात एकरूप झालेले लोकांना स्वातंत्र्य लढय़ात सामील होण्याची प्रेरणा देणारे लोकमान्य टिळक १ ऑगस्ट १९२० या दिवशी अनंतात विलीन झाले.

No comments:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर